अक्कलकोट : माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील नेते, कार्यकर्ते आणि विविध राजकीय घटकांशी संपर्क वाढविल्याचे चित्र आहे. त्यांच्या या भेटीगाठी केवळ सदिच्छा भेटी आहेत की त्यामागे आगामी राजकीय घडामोडींची पूर्वतयारी आहे, आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने रणजितसिंह मोहिते-पाटील सक्रिय याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांची वाढलेली सक्रियता महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः अक्कलकोटसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात त्यांचा वाढता संपर्क आगामी समीकरणांवर परिणाम करू शकतो? स्थानिक नेत्यांमधील नाराजी, गटांतर्गत मतभेद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या राजकीय संधींचा अंदाज घेत मोहिते-पाटील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सक्रिय करत आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील विविध भागांत संपर्क वाढवत स्थानिक नेत्यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर मोहिते-पाटील गटाकडूनही राजकीय सक्रियता वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अलीकडील दौऱ्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
मोहिते-पाटील घराण्याचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. मात्र, अलीकडच्या काळात पालकमंत्री गोरे यांनी विविध तालुक्यांमध्ये आपला संपर्क मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांशी संवाद, कार्यकर्त्यांच्या भेटी आणि विविध राजकीय गटांशी साधला जाणारा संपर्क यामुळे जिल्ह्यातील राजकीय शक्तिसंतुलनात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष- दिलीपभाऊ सिद्धे, जिल्हा परिषद सदस्य- प्रवीण तानवडे, आनंद तानवडे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, शेरीकर बंधू यांच्या निवासस्थानी भेट दिली. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चौकट :
*स्वर्गीय प्रदीप जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन –*
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तालुक्यातील गोगाव येथे जाऊन स्वर्गीय प्रदीप जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. एक सच्चा, निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याची भावना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
Post Views: 8