सांगोला – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सांगोला महाविद्यालय येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मराठी विभागप्रमुख डॉ.संतोष लोंढे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.चित्रा जांभळे तसेच आयक्यूएसी प्रमुख डॉ.राम पवार उपस्थित होते. मनोगतात डॉ.संतोष लोंढे यांनी शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो असे सांगितले. डॉ.चित्रा जांभळे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांची शिकवण देत त्यांच्या भविष्यास आकार देतात असे सांगितले. यावेळी विद्यार्थी रोशन येलपले, वरुण गायकवाड, पठाण अल्फिया, लिगाडे सृष्टी यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितले. याावेळी डॉ.शितल घोंगडे, प्रा.राहुल गोडसे, प्रा.रोहित पवार, ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत बाबर, प्रास्ताविक डॉ.प्रवीण खराडे तर आभार भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमेश बुगड यांनी मानले. प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.