सोलापूर – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. २ व ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पडताळणी प्रक्रियेत निवड झालेल्या ३४९ उमेदवारांपैकी ३३२ उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली. मात्र, उर्वरित १७ उमेदवार अंतिम संधी देऊनही गैरहजर राहिल्याने त्यांच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीअंतर्गत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तसेच अन्य संस्थांमध्ये सुमारे १३ हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळत आहे. त्याच प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ३४९ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.
या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २ व ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. त्यावेळी १७ उमेदवार अनुपस्थित राहिल्याने त्यांना ७ सप्टेंबर रोजी अंतिम संधी देण्यात आली. मात्र, या संधीचाही लाभ न घेतल्याने आता संबंधित उमेदवारांच्या जागा पुढील फेरीत भरण्याची शक्यता आहे.
कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे शाळा निवडीची संधी देऊन नियुक्ती प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवीच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेली पदे ‘कन्व्हर्टेड राउंड’ अर्थात रूपांतरित फेरीत भरण्याची प्रक्रिया होणार आहे. या फेरीत आरक्षणाच्या नियमानुसार उपलब्ध उमेदवारांच्या माध्यमातून रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या जागांकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
चौकट
१७ उमेदवारांच्या गैरहजेरीमुळे रिक्त होणाऱ्या जागांसह समांतर आरक्षणातील रिक्त पदे पुढील ‘कन्व्हर्ट राउंड’मध्ये कशी भरली जातात, याकडे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
कोट
नियुक्त्या लवकर करण्याची मागणी
“गेल्या वर्षभरापासून राज्यातील हजारो उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करीत होते. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ३३२ पेक्षा अधिक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. आता समुपदेशन प्रक्रिया तातडीने घेऊन उमेदवारांना शाळा निवडीची संधी आणि नियुक्ती आदेश द्यावेत. तसेच रूपांतरित फेरीतील एकही जागा रिक्त राहू नये आणि पुढील महिन्यात या जागाही भराव्यात. पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करून अंतिम निवड यादी पारदर्शकपणे प्रसिद्ध करावी,” अशी मागणी डि.एड.-बी.एड. असोसिएशन व पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केली.
कोट
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु १७ उमेदवार अनुपस्थित राहिले अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दिली.
Post Views: 9