सोलापूर : मनुष्याच्या जीवनातील दुःखांचे मूळ अनेकदा बाह्य परिस्थितीत नसून तुलना, अपेक्षा, राग-द्वेष आणि ‘माझे-तुझे, आपले-परके’ या भावनेत असते. त्यामुळे बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःची विचारपद्धती आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे महत्त्वाचे आहे, असा चिंतनपर संदेश श्री १०८ सुप्रभसागर महाराज यांनी प्रवचनातून दिला.
‘त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही’ अशा तुलनेतून असंतोष वाढतो, तर तुलना थांबली की समाधानाची सुरुवात होते. इतरांच्या चुका शोधण्याऐवजी स्वतःच्या चुका ओळखून त्यांत सुधारणा करणे, दिखावा टाळून साधेपणा स्वीकारणे आणि प्रत्येक जीवामध्ये आत्मतत्त्व पाहून समतेची भावना जोपासणे आवश्यक आहे, असे महाराजांनी सांगितले.
माणसांचा स्वार्थासाठी उपयोग करण्याऐवजी त्यांना प्रेम, विश्वास आणि आपुलकी द्यावी. गटबाजी व मतभेदांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यापेक्षा माणुसकीला प्राधान्य द्यावे. मनुष्यजन्म, उत्तम संस्कार आणि सद्गुरूंचे मार्गदर्शन ही मोठी पुण्याई असून तिचा उपयोग आत्मकल्याणासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गुरुमंत्र हा केवळ उच्चारण्याचा विषय नसून श्रद्धा, समर्पण आणि आचरणाचा मार्ग आहे. गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालणे हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.
या वेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, सौ. माया गांधी, विश्वस्त पराग शहा, वैभव गांधी आदी उपस्थित होते.
*चौकट*
शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रवचन; विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत वालचंद शिक्षण समूहातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल हॉलमध्ये ‘सम्यकज्ञान’ या विषयावर विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.























