सोलापूर : कर्तव्यावर जात असताना कारने धडक दिल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील तीन महिला सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मधला मारुती चौकात घडली. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करूनही कॅशलेस वैद्यकीय विमा अद्याप लागू न झाल्याने कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
सविता अरुण सोनकांबळे, कौशल्या यादव रोकडे आणि गोदाबाई रंगनाथ गजघाटे अशी जखमी महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तिन्ही महिला बाळीवेस ते गेंट्याल टाकी परिसरात दैनंदिन साफसफाईचे काम करण्यासाठी रिक्षाने जात होत्या. त्यावेळी कर्नाटक पासिंगच्या केए ३१ ए ४८३२ क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे आणि आरोग्य निरीक्षक भंडारी यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तीन कोटींच्या तरतुदीनंतरही विमा रखडला
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी तीन कोटी रुपयांचे कॅशलेस वैद्यकीय विम्याचे बजेट मंजूर केले आहे. मात्र चार महिने उलटूनही हा विमा लागू झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च परवडत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याचे कामगार नेते सदाफुले यांनी सांगितले.
पंधरा दिवसांत विमा लागू करा
कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मंजूर केलेल्या निधीचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळणे आवश्यक आहे. अपघात किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी कॅशलेस वैद्यकीय विमा तातडीने लागू करावा. येत्या पंधरा दिवसांत विमा योजना लागू न केल्यास या प्रश्नावर गंभीर भूमिका घेतली जाईल, असा इशारा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी दिला आहे.
Post Views: 8