बार्शी – शहरातील ‘तळ्यावरची देवी’ भवानी पेठ येथे दसऱ्याच्या दिवशी शिलंगण सोहळ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका तरुणाची दीड लाख किमतीची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम बेकरीजवळ उपळाई रोड, बार्शी येथील रहिवासी ऋषिकेश अशोक काकडे (वय २७) हे दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता त्यांचे भाऊ अभिषेक काकडे यांच्यासोबत भवानी पेठ येथील तळ्यावरची देवी मंदिरात शिलंगण खेळण्यासाठी गेले होते. देवीच्या पालखीजवळ विडा ठेवण्यासाठी गेले असताना तेथील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची आणि सुमारे १ लाख ५३ हजार किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली. गळ्यात साखळी नसल्याचे लक्षात आल्यावर ऋषिकेश व त्यांच्या भावाने परिसरात शोध घेतला; परंतु ती सापडली नाही. यानंतर ऋषिकेश काकडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार शबाना कोतवाल करीत आहे.
Post Views: 16