सोलापूर : पत्रकारितेचे मुख्य काम केवळ बातम्या देणे नसून घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करणेही महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास करून त्यातील चांगल्या-वाईट बाबी जनतेसमोर मांडल्या पाहिजेत. पत्रकारांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींच्या कामाचे मूल्यमापन करताना त्यातील चांगल्या आणि त्रुटीपूर्ण बाबींचे विश्लेषण करावे. पत्रकारितेत संयम, अभ्यास आणि स्वतंत्र विचार यांना महत्त्व आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र संपादक परिषद, मुंबई यांच्या वतीने कै. यशवंत पाध्ये स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे उपसंपादक विक्रम खेलबुडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर नागणसूर बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, विभागीय अधिसुकृती समिती सदस्य गोरख तावरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये रक्कम, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, पत्रकारांच्या सुविधा आणि कल्याणासाठी काम करण्याची तळमळ असणे आवश्यक आहे. केवळ पत्रकारितेचे लेबल लावून पुढे जाण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष काम करणे महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या निवासासाठी सोलापुरात उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील पत्रकारांना शहरात राहणे आणि घरभाडे परवडणे कठीण असते. अशा पत्रकारांसाठी निवासाची व्यवस्था उभी करणे ही महत्त्वाची आणि कौतुकास्पद बाब आहे. समाजातील चांगल्या कामांची दखल घेणे, त्यांना प्रसिद्धी देणे आणि संबंधितांना प्रोत्साहन देणे ही पत्रकारितेची सकारात्मक भूमिका आहे. राजकीय आणि सामाजिक विचारांचा अभ्यास करण्यासाठी वाचन आवश्यक आहे.
अध्यक्ष संजय मलमे यांनी महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्याचा आढावा मांडत आठवणींना उजाळा दिला. यापूर्वी हा पुरस्कार (स्वर्गीय) बाळासाहेब ठाकरे यांनाही देण्यात आला होता. या पुरस्काराची मोठी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ॲड. धनंजय माने, मनीष केत यांचीही भाषणे झाली. महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर सरचिटणीस आफताब शेख यांनी आभार मानले.
गुणेषु पूजास्थानं न च लिंगं न च वयः : श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी
श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले,
चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव हा त्याच्या वयावर किंवा इतर कोणत्याही बाबीवर अवलंबून नसतो, तर त्याच्या गुणांवर आणि कार्यावर अवलंबून असतो. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ आणि ‘परोपकारार्थमिदं शरीरम्’ ही भावना मनात ठेवून समाजासाठी निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे आवश्यक आहे. पत्रकार संघाचे १४ वर्षे अध्यक्षपद सांभाळून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या विक्रम खेलबुडे यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे, असेही श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.
पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्तांना देणार : खेलबुडे
सत्कारमूर्ती विक्रम खेलबुडे यांनी पुरस्काराच्या रूपाने मिळालेली पाच हजार रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा केली. ही रक्कम लवकरच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Post Views: 16