जेऊर – करमाळा पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना जखमी झालेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. सांगवी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उघडे यांच्यासह दोन पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) सुरू असून, प्रकरणातील वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा मोहिते यांना २० ऑक्टोबर रोजी करमाळा पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कोठडीत असताना त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र २३ ऑक्टोबर रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कोठडीतील परिस्थिती, मोहिते यांना झालेली दुखापत, त्यांना देण्यात आलेले उपचार आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित तिघांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.कृष्णा मोहिते यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, त्यांना दुखापत कशी झाली आणि उपचार प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का, याची तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. या तपासातून जबाबदारी निश्चित होण्याची अपेक्षा आहे. तपासातील निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरणार आहे.