पंढरपूर – “भारतीय संस्कृती ही कृषिनिष्ठ असून प्राचीन काळापासून नक्षत्रे, ऋतू आणि निसर्गाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन केले जात होते. भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेचा आधुनिक विज्ञानाच्या आधारे डोळसपणे उपयोग केल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी ज्ञानाधारित शेती करून जमिनीचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि उत्पादनवाढ यांवर भर द्यावा”, असे प्रतिपादन सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते व प्रगतिशील बागायतदार भारत रानरुई यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथे आयोजित ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते.
भारत रानरुई यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘देशी गायी, पंचगव्य, सेंद्रिय निविष्ठा आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांचे शेतीतील महत्त्व स्पष्ट केले. शेतीमध्ये सातत्याने प्रयोग करणे, स्थानिक परिस्थितीनुसार पिकांची निवड करणे आणि निसर्गाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करून वृक्षसंवर्धनाचे आवाहनही त्यांनी केले’.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की, “भारतीय समाजाकडे पारंपरिक व्यापार, उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे समृद्ध ज्ञान होते. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड दिल्यास रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे आणि स्थानिक लघु व कुटीरउद्योगांना पूरक ज्ञान देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.”
या कार्यशाळेत व्होकल फाँर लोकल ( ‘Vocal for Local’ ) या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरा, पारंपरिक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे व माहितीपटांचे सादरीकरण आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माउली लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.दत्तात्रय डांगे यांनी केले. सहसमन्वयक डॉ. महादेव कोरी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ सविता उपल्ली आणि प्रा. साधना कटकमवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयक्यूएसी समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. समाधान माने, डॉ. सुशील शिंदे, डॉ. राजेश कवडे, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, स्वायत्त महाविद्यालय विभागाचे समन्वयक डॉ. आनंद शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील २४ विभागांतील विद्यार्थी व शिक्षकांसह कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर आणि दहिवडी महाविद्यालय, दहिवडी येथील प्रतिनिधींनीही कार्यशाळेत सहभाग घेतला.
Post Views: 7