सोलापूर : ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ अॅप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित १३६ सेवांशी संबंधित अर्ज आणि तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या अंतर्गत एकाच दिवशी तब्बल ३७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एकूण १ लाख ३ हजार ६५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वाधिक दंडात्मक कारवाई ठरली आहे.
आतापर्यंत एकूण १५ लाख ५४ हजार ९३७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महापालिकेकडून ‘आपली तक्रार’ पोर्टल आणि ‘माय सोलापूर’ अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयानुसार महापालिकेच्या एकूण १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन अर्ज आणि तक्रारी दाखल होत आहेत.
या तक्रारी आणि अर्जांचे संबंधित विभागांनी विहित मुदतीत निराकरण करून त्याबाबतची अद्ययावत माहिती पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. मात्र, ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ अॅप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अनेक अर्ज आणि तक्रारी प्रलंबित असल्याचे आढावा बैठकीत निदर्शनास आले. तक्रारी आणि अर्जांचा वेळेत निपटारा न करणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ही परिस्थिती कार्यालयीन शिस्तीला बाधा पोहोचविणारी आहे. याच पार्श्वभूमीवर मुदतीत तक्रारींचे निराकरण न करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी दिले. उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली असून, अधीक्षक रजाक पेंढारी यांच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाने प्रलंबित तक्रारींची माहिती संकलित केली. उपायुक्त आशिष लोकरे यांनी वेळोवेळी कारवाईचे आदेश काढले होते.
यापुढे नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारी आणि सेवांशी संबंधित अर्ज प्रलंबित राहिल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. महापालिकेने नागरिकांना त्यांच्या समस्या आणि सेवांसंदर्भातील अर्ज ‘माय सोलापूर’ अॅप किंवा ‘आपली तक्रार’ पोर्टलवरच नोंदविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तक्रारींचे ऑनलाइन निरीक्षण, पारदर्शकता आणि वेळेत निपटारा सुनिश्चित होणार आहे.
एकाच दिवशी लाख रुपयांच्या दंडाचा दणका
दिनांक २६ मे २०२६ रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांनी ‘आपली तक्रार’ आणि ‘माय सोलापूर’ अॅपअंतर्गत तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी ११ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एकूण ४ हजार २०० रुपयांचा दंड केला. त्याच दिवशी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्जांचा वेळेत निपटारा न केल्याने २६ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तब्बल ९९ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या दोन्ही कारवायांमधून एकाच दिवशी ३७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून एकूण १ लाख ३ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई मानली जात आहे.
असा आहे एकूण कारवाईचा तपशील
महापालिकेने तक्रारी प्रलंबित ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा नियम कडकपणे लागू केला आहे. त्यानुसार आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील याप्रमाणे — ‘आपली तक्रार’ अंतर्गत : ४ लाख ६९ हजार ४०० रुपये, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत : ४ लाख ७७ हजार ५० रुपये, गैरवर्तन प्रकरणांत : ६ लाख ८ हजार ४८७ रुपये अशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत एकूण १५ लाख ५४ हजार ९३७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
Post Views: 56