सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील मुलांच्या ‘इन्व्हिटेशन टूर्नामेंट’मध्ये सोलापूरच्या संघाने वर्चस्व गाजवत धाराशिव संघावर दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार संदेश गाडे याने २१९ धावांची द्विशतकी खेळी साकारली. ईश्वर सहारणचे ८ बळी घेत त्याला साथ दिली.
संदेशला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संदेश गाडेने मैदानाचा ताबा घेत उस्मानाबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने केवळ २३० चेंडूत २१९ धावा कुटत शानदार द्विशतक झळकावले. संदेशला ययाती देवकते (३१), श्रवण माळी (२७) आणि ऋग्वेद पाटील (२६) यांनी चांगली साथ दिली. यामुळे सोलापूरचा पहिला डाव ३५१ धावांवर संपला. उस्मानाबादकडून गोलंदाजीत हकानी हुसेनने ४, रवींद्रने ३ तर पृथ्वीराजने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेला. उस्मानाबादचा संघ सोलापूरच्या गोलंदाजीसमोर ढेपाळला. त्यांचा पहिला डाव केवळ १५७ धावांत आटोपला. सोलापूरच्या ईश्वर सहारनने अवघ्या २९ धावांत ५ बळी घेत उस्मानाबादचे कंबरडे मोडले. त्याला श्रवण माळीने २ बळी घेऊन उत्तम साथ दिली. उस्मानाबादकडून गौरव सावंतने सर्वाधिक ४८ धावा केल्या.
——
फॉलोऑन व सोलापूरचा विजय
पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्यामुळे सोलापूरने उस्मानाबादला ‘फॉलोऑन’ दिला. दुसऱ्या डावातही सोलापूरच्या गोलंदाजांनी आपली पकड कायम ठेवली. दुसऱ्या डावात उस्मानाबादची स्थिती ८ बाद १६७ धावा अशी असताना सामन्याची वेळ संपली. नियमानुसार, पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर सोलापूर संघाला विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या डावात सोलापूरकडून ईश्वर सहारन आणि श्रवण माळी यांनी प्रत्येकी ३, तर सार्थक कन्नाने २ बळी घेतले.


























