तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी, सप्तमीच्या पावन पर्वावर देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य स्थापनेशी जोडलेल्या भवानी तलवारीच्या परंपरेचे स्मरण करून देणारी ही महापूजा नवरात्रोत्सवातील महत्त्वाच्या धार्मिक विधींपैकी एक मानली जाते. या महापूजेमुळे तुळजाभवानी मातेच्या शक्ती, शौर्य आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवीने भवानी तलवार दिली होती, अशी लोकमान्यता आहे. या तलवारीच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचा मार्ग सुकर झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेत भवानी तलवारीला विशेष महत्त्व असून, ती शौर्य, सामर्थ्य आणि स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक मानली जाते. याच परंपरेचा वारसा जपण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवात भवानी तलवार अलंकार महापूजा मांडली जाते.
नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. विविध अलंकारांनी सजविलेल्या देवीच्या रूपांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक तुळजापूर येथे येत आहेत. सप्तमीच्या दिवशी मांडण्यात आलेल्या भवानी तलवार अलंकार महापूजेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
मोर वाहनातून छबिना मिरवणूक
दरम्यान, शनिवारी रात्री श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक मोर या वाहनातून काढण्यात आली. नवरात्र महोत्सवातील पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्सवपरंपरेचा भाग असलेल्या या मिरवणुकीत देवीच्या दर्शनासाठी भाविक उपस्थित होते. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीमुळे मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक विधी, महापूजा आणि पारंपरिक उत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. भक्ती, श्रद्धा आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम असलेल्या या महोत्सवामुळे तुळजापूर नगरीत उत्साहाचे वातावरण आहे.





















