जेऊर – उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असताना आता उजनी धरण परिसरात विविध मोठे प्रकल्प उभारण्याच्या हालचालींमुळे शेतकरी, मच्छीमार आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी चर्चेत असलेला उजनी पर्यटन प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात न उतरल्याने तो आता दिवास्वप्न ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दुसरीकडे, उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर, तरंगता विद्युत प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि अणुऊर्जा प्रकल्पांसारखे मोठे प्रकल्प प्रस्तावित असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उजनीच्या पाण्यावर आणि परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर बड्या उद्योजकांचा डोळा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. या प्रकल्पांमुळे शेतकरी, मासेमारी करणारे व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शेतकरी, वारकरी संप्रदाय आणि मच्छीमार बांधव एकवटले आहेत.
या प्रकल्पांचे संभाव्य दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडून गावोगावी जनजागृती केली जात आहे. उजनी धरणाचे पर्यावरण, पाणीसाठा, शेती आणि स्थानिक रोजगार यांचे संरक्षण व्हावे, तसेच स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.
या आंदोलनात आता राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. उजनी धरण परिसरातील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि संभाव्य प्रकल्पांविरोधात जनमत संघटित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उजनी धरणावरील भीमानगर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, वारकरी, मच्छीमार आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनातून उजनीच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता असून, शासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Post Views: 11