सोलापूर : सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त मसरे परिवाराच्यावतीने आयोजित पारंपरिक दहीहंडी मिरवणूक रविवारी भक्तिमय वातावरणात पार पडली.
उत्तर कसबा येथील मसरेवाड्यातून सायंकाळी सात वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. संबळ, टाळ, बँडपथक आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत पोत घेतलेले आराधी भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.मसरे परिवाराकडून अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. या सोहळ्यानिमित्त मसरेवाड्यात पितळी हांडे ठेवण्यात आले होते. भाविकांनी त्यामध्ये श्रद्धेने दही जमा केले. यंदा २५ लिटरचे दोन आणि १५ लिटरचे २३ असे एकूण २५ हंडे दही मिरवणुकीतून श्री रूपाभवानी देवी मंदिरात नेण्यात आले.
या सोहळ्यासाठी मंदिराचे विश्वस्त, वहिवाटदार व
पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिध्देश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्साही वातावरणामुळे दहीहंडी सोहळ्याने नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरणात भर घातली.
वाद्यांच्या गजरात मिरवणूक
उत्तर कसबा येथील मसरेवाड्यातून निघालेली मिरवणूक टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, बलिदान चौक आणि रूपाभवानी चौक मार्गे श्री रूपाभवानी देवी मंदिरात पोहोचली. मिरवणुकीच्या मार्गावर देवीच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते. ठिकठिकाणी भाविकांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
५०० लिटर दह्याने देवीला अभिषेक
मंदिरात सायंकाळी चार ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत होमहवन विधी पार पडले. त्यानंतर रात्री नऊ वाजता श्री रूपाभवानी देवीला ५०० लिटर दह्याने विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अभिषेकानंतर महापूजा, छबिना मिरवणूक आणि महाआरती असे धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.
Post Views: 4