सोलापूर – विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात प्रचारार्थ तसेच बैठका घेण्यासाठी आलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. गोकुळचे उदाहरण देत, सत्ताधाऱ्यांना इशारा देताना सांगितले की, सत्ताधाऱ्यांनी मान सन्मान राखून बोलावे, आजच्या ताज्या घडामोडी वरून लक्षात घ्यावे. अन्यथा तुमचा देखील गोकुळ होईल असे देखील त्यांनी मिस्कील टिपणी केली.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या उमेदवारीवरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सचिन सानप यांना आम्ही ओळखत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. पालकमंत्री यांनी मिश्किल वक्तव्य केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात मनीष काळजे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा सबुरीचा सल्ला दिला आहे.
केवळ एका निवडणुकीसाठी आपण आपापसात मन दुखावतील असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये समन्वय असावा. राज्यात महायुतीचे सरकार आहे. ही लढत केवळ मैत्रीपूर्ण लढत आहे. हे लक्षात ठेवावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच मतमोजणीनंतर सर्वांना सचिन सानप कोण आहेत हे देखील समजून येईल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




















