वैराग – आजच्या डिजिटल आणि स्मार्ट युगात सोशल मीडियाचा अतिवापर तरुणाईसाठी कसा घातक ठरू शकतो आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा “डिजिटल मित्र की शत्रू? सायबर ब्लॅकमेलिंग व सुरक्षितता” हा विशेष प्रबोधन व मार्गदर्शन मेळावा उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल कृषी तंत्रनिकेतन, डी. फार्मसी आणि बी. फार्मसी महाविद्यालयात दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. ‘एकता महिला मंच’चे प्रमुख श्री. प्रभाकर क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक काळात सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा – प्रभाकर क्षीरसागर
मेळाव्यात मार्गदर्शन करताना एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे मुलांच्या अभ्यासावर व मानसिकतेवर होणाऱ्या दुष्परिणामांवर सविस्तर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक काळात सोशल मीडियाचा वापर कमीत कमी आणि केवळ गरजेपुरताच केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या अभ्यासावर आणि भविष्यावर कोणतेही विपरीत परिणाम होणार नाहीत.”
अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका; धोका दिसताच ब्लॉक करा!
सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करताना क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सावधगिरीचे महत्त्वाचे धडे दिले. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीची (विशेषतः अनोळखी महिला किंवा मुलींची) फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये आणि त्यांच्याशी संभाषण वाढवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. संवाद साधताना जरासाही संशय किंवा धोक्याची शक्यता निर्माण झाल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ ब्लॉक करावे आणि खबरदारी बाघावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या सखोल आणि वास्तववादी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून भुलथापांना किंवा चुकीच्या मार्गाला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कृषी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
लोकमंगल कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मार्गदर्शन सत्राच्या वेळी प्राचार्य अमोल शिंदे, डॉ. विजयाराणी दावणे, प्रा. किरण माळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार प्रा. किरण माळी यांनी मानले.
कृषी महाविद्यालयातील सत्रानंतर लोकमंगल डी. फार्मसी आणि बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीही विशेष मार्गदर्शन सत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सत्रास डी. व बी. फार्मसीच्या प्राचार्या राणी मेहेत्रे यांच्यासह महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात सायबर ब्लॅकमेलिंग आणि ऑनलाईन सुरक्षिततेविषयी मिळालेल्या या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमधून आणि व्यवस्थापनाकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे.
Post Views: 6