सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अभय योजनेअंतर्गत थकीत भाडे वसुलीसाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकीत रक्कम न भरणाऱ्या सहा गाळेधारकांचे गाळे सील करण्यात आले. दरम्यान, काही मिळकतधारकांनी थकीत भाड्याची संपूर्ण रक्कम भरल्याने त्यांचे गाळे पुन्हा खुले करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या भूमी व मालमत्ता कर विभागाकडून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून थकबाकीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असतानाही काही गाळेधारकांनी वारंवार संधी देऊनही थकीत भाडे भरले नाही. त्यामुळे प्रशासनाने संबंधित मिळकतींवर कारवाई केली.या कारवाईत कुंभार वेस येथील संतोष सुभाषचंद्र निरंकारी यांचा गाळा सील करण्यात आला. तसेच होटगी रोड येथील वसंत फडके, वर्षा नितीन मस्के , रियाज रमजानसाब शेख, मच्छिंद्र दामोदर चौगुले आणि पंकज व्हनकळस यांच्या गाळ्यांवरही सील लावण्यात आले. या सहा मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात भाडे थकीत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
थकीत भाड्याची संपूर्ण रक्कम भरलेल्या काही मिळकतधारकांचे गाळे सीलमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित गाळेधारकांनीही आपल्याकडील थकीत रक्कम तातडीने भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि संभाव्य कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी व मालमत्ता विभागाकडून थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून थकबाकीदारांवरील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
———
Post Views: 7