सोलापूर – गावातील आरोग्यविषयक समस्या वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आरोग्यसेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गावांचा आरोग्यविषयक निर्देशांक सुधारणे, या उद्देशाने अक्कलकोट तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती अक्कलकोट येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. गावाचा आरोग्यविकास केवळ आरोग्य विभागापुरता मर्यादित न ठेवता विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून साधण्यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला.
जिल्हा आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या निर्देशानुसार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे आणि गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे व तालुकास्तरीय प्रशिक्षकांनी अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले.
गावातील आरोग्यविषयक समस्या ओळखणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करणे, आरोग्यविषयक निर्देशांकांमध्ये सुधारणा घडवणे आणि नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे, या बाबींवर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रमांचे नियोजन कसे करावे, त्यांची अंमलबजावणी कशी करावी आणि लोकसहभागातून आरोग्यविषयक उद्दिष्टे कशी साध्य करावीत, यावरही चर्चा झाली. अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि आरोग्य संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहिती देऊन कामकाजाला प्रोत्साहन देण्यात आले.
या प्रशिक्षणास पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहायिका, आरोग्य सेवक व सेविका तसेच गटप्रवर्तक उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी तालुका विस्तार अधिकारी महेश भोरे, आरोग्य सहाय्यक सिद्रामप्पा लोकापुरे, आरोग्य पर्यवेक्षक सुरेश भास्कर, कुष्ठरोग तंत्रज्ञ श्रीकांत हसरमनी, आरोग्य सेवक भरत जाधव, टीबी सुपरवायझर शिवाजी चंदनशिवे, नजीर दलाल, वैभव हिप्परगी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
लोकसहभागातून आरोग्यसंपन्न गावांचा संकल्प
अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, तरुण मंडळे, महिला बचत गट तसेच शिक्षण आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागासह अन्य शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी केले.
Post Views: 14