करमाळा – जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभा सुरू असताना झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या सोलापूर शाखेने जिल्ह्यातील नियोजित ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काहींनी ग्रामपंचायत कामकाजातून ग्रामसभा वगळण्याची मागणी ही काहींनी केली आहे.
मात्र, या बहिष्कार, आंदोलनाचा फटका गावपातळीवरील लोकशाही प्रक्रियेला बसू नये, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार हरिभाऊ हिरडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसभा हा पंचायत राज व्यवस्थेचा आणि ग्रामविकासाचा आत्मा आहे. गावातील नागरिकांना आपल्या गावाच्या विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेण्याचे प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा होय. ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर चर्चा होते, विकासकामांना प्राधान्यक्रम ठरविला जातो तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळते.
गावच्या जमाखर्चाचा, झालेल्या विकासकामांचा तसेच प्रस्तावित कामांचा लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडला जातो. त्यामुळे ग्रामसभा ही केवळ शासकीय औपचारिकता नसून गावच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग निर्माण करणारी महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया आहे. ग्रामसभा न झाल्यास अनेक विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि गावाच्या भविष्यातील नियोजनाबाबत नागरिकांना थेट चर्चा व माहिती घेण्याची संधी उपलब्ध होत नाही.
ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाकडे ठोस मागण्या मांडाव्यात आणि त्याचवेळी गावातील नियोजित ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामविकास प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत; त्याचप्रमाणे ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामसभा हेही ग्रामविकासाचे अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने ग्रामसभा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि शासनानेही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत.
गावाचा विकास, पारदर्शक कारभार आणि लोकसहभाग अबाधित ठेवण्यासाठी ग्रामसभा त्वरीत घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या मागणीचे लेखी निवेदन त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांना दिले आहे. निवेदनावर राज झिंजाडे, हर्षद आढाव, रमेश आमटे, संदीप नंदरगे,विलास रणवरे, सोमनाथ झिंजाडे, मारुती लाढाणे, संतोष बागडे, रामचंद्र भांड, राजेंद्र लोखंडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Post Views: 3