सोलापूर – विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जय हिंद कुर्डूवाडी संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यू लाईफ संघाचा ८ गडी राखून धुव्वा उडवला.
न्यू लाईफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यू लाईफची सुरुवात अडखळती झाली असली, तरी बबलू नायकवाडीने एका बाजूने किल्ला लढवत ८४ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला अकिबने २९ धावा करत चांगली साथ दिली. मात्र, जय हिंद कुर्डूवाडीच्या अचूक गोलंदाजीसमोर इतर फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. न्यू लाईफचा संपूर्ण संघ ३२.२ षटकांत २०० धावांवर बाद झाला.
जय हिंद कुर्डूवाडी कडून गोलंदाजीत नागेश कोरे याने घातक मारा करत ३ बळी घेतले. त्याला अमरदीप शिंदे आणि सचिन गोडसे यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली.
२०१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जय हिंद कुर्डूवाडी संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व राखले. सलामीवीर सस्मित गायकवाड याने ५७ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली, तर दिनेश कनसे याने ४७ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर जय हिंद कुर्डूवाडीने अवघ्या २३.१ षटकांत २ गडी गमावून २०१ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि ८ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला.
न्यू लाईफ संघाकडून गोलंदाजीत फिरोज पठाण आणि बबलू नायकवाडी यांना प्रत्येकी १ बळी मिळवता आला, परंतु ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
जय हिंद कुर्दवाडीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सस्मित गायकवाड याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सामन्यासाठी पंच म्हणून चंदू मंजेली आणि प्रवीण कुलकर्णी यांनी तर गुणलेखक म्हणून शुभम मुत्तुर यांनी काम पहिले.
Post Views: 6