सोलापूर : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार (२० जुलै) रोजी राज्यभर पुकारण्यात आलेला निमा (NIMA) डॉक्टरांचा २४ तासांचा संप मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी सर्व नियमित ओपीडीसह वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहणार असून डॉक्टर काळ्याफिती लावून काम करतील.
डोंबिवलीतील घटनेनंतर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र शाखेने राज्यव्यापी संपाची घोषणा केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेत आरोपी रमेश म्हात्रे व त्याच्या साथीदारांचा जामीन रद्द करत सर्व वैद्यकीय संघटनांना संप टाळण्याची विनंती केली. न्यायालयाच्या या भूमिकेला मान देत निमा महाराष्ट्र शाखेने २० ते २१ जुलैदरम्यान नियोजित २४ तासांचा संप मागे घेतला.
निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर आणि निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी सांगितले की, संपाचा निर्णय रुग्णांच्या विरोधात नसून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी होता. आता संपाऐवजी राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सोलापुरात सोमवारी सकाळी १० वाजता निमा पदाधिकारी काळ्याफिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. दोषींवर कठोर कारवाई, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधातील कायदे अधिक प्रभावी करणे, अशा गुन्ह्यांची जलदगती न्यायालयात सुनावणी, २४ तास सुरक्षा व्यवस्था, तसेच सेंट्रल कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थकेअर व्हायोलन्स प्रिव्हेन्शन कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात बेमुदत आंदोलनाचा इशाराही निमा संघटनेने दिला आहे.
Post Views: 34