सांगोला – सांगोला तालुक्यातील उदनवाडी गावासह परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर उदनवाडी गावातून वाहणाऱ्या बेलवण नदीच्या पात्रात उपलब्ध जलस्रोतांतून तातडीने पाणी सोडावे, नदीपात्रातील बंधारे भरावेत आणि विहिरींसह भूजलसाठ्यांचे पुनर्भरण करावे, अशी मागणी उदनवाडी येथील ग्रामस्थ एस.मुलाणी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बेलवण नदीच्या पात्रात पाणी उपलब्ध झाल्यास नदीलगतच्या विहिरी, भूजलपातळी आणि शेतीसाठी आवश्यक पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन तातडीचा कृती आराखडा निश्चित करावा. पाणी सोडण्यात तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्या दूर करून पर्यायी जलस्रोतांचा विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उदनवाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही एस.मुलाणी यांनी व्यक्त केली आहे.