कोल्हापूर – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ( जि तो) कोल्हापूर चॅप्टरचा पदग्रहण समारंभ हॉटेल सयाजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारंभात जितो कोल्हापूर शाखा अध्यक्षपदी राजीव परीख, तर चीफ सेक्रेटरीपदी रविंद्र देवमोरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जि तो अँपेक्स चे माजी अध्यक्ष विजयजी भंडारी- सेक्रेटरी सुजीतजी भटेवरा, जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र खिवंसरा, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मनोज छाजेड आणि सौ. प्रियंका परमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून उद्योगपती संजयजी घोडावत उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष रवी संघवी यांनी प्रास्ताविकात आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा व कामगिरीचा आढावा घेतला. मावळते चीफ सेक्रेटरी श्री. अनिल पाटील यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे चॅप्टरच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती दिली.यावेळी संजयजी डांगी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापूर चॅप्टरच्या प्रगतीचे कौतुक करून प्रशिक्षण उपक्रम, विवाहविषयक मॅट्रिमोनी सेवा आणि शैक्षणिक कर्ज यांसारख्या उपक्रमांसाठी कोल्हापुरात मोठी संधी असल्याचे नमूद केले. जितो अपेक्स चे सेक्रेटरी जनरल हेमंतभाई शहा यांनीही व्हिडिओ कॉलद्वारे कोल्हापुरात जैन समाजासाठी, विशेषतः विद्यार्थिनी व महिलांसाठी वसतिगृह उभारण्याची गरज अधोरेखित केली आणि चॅप्टरच्या विस्तारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
विजयजी भंडारी यांनी जितोच्या कार्याची माहिती देत जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना कशा प्रकारे योगदान देऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. सुजीत भटेवरा यांनी युवा वर्गासाठी क्रीडा स्पर्धा, विविध प्रदर्शने, बी टू बी नेटवर्किंग आणि स्टार्टअप उपक्रमांचे महत्त्व विशद केले. पदग्रहणानंतर नूतन अध्यक्ष श्री. राजीव सी. परीख यांनी आपल्या मनोगतात जि तो च्या सर्व व्हर्टिकल्सच्या माध्यमातून प्रभावी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. जैन समाजातील युवक, महिला, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापुरात जैन समाजासाठी वसतिगृह उभारण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सन्माननीय अतिथी श्री. संजयजी घोडावत यांनी आपल्या खास विनोदी व प्रभावी शैलीत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
या पदग्रहण समारंभात नूतन उपाध्यक्ष म्हणून हर्षद दलाल व श्री. दिलीप ओसवाल, तसेच सचिवपदी श्री. जयकुमार परीख व श्री. ललितभाई ओसवाल, खजानणीस श्री. प्रतीक ओसवाल, श्री. चंद्रकांत ओसवाल आणि अतुल शहा, महिला आघाडी च्या सौ. स्वीटी पोरवाल, व सौ. मिनल जैन, तसेच युवा आघाडी चे पुनीत कोठारी, आशीष देसाई, नेहुल राठोड आदी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
या कार्यक्रमात २२ नवीन सदस्यांचे जितो कोल्हापूर चॅप्टरमध्ये स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे किरण पाटील यांचा समावेश आहे. जितो कोल्हापूर चॅप्टर तर्फे नेमचंदजी संघवी, जयकुमार परीख, संजय शेटे आणि उपल शहा यांना विशिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला जितो कोल्हापूरचे माजी अध्यक्ष नेमचंद संघवी, जितेंद्र राठोड, राजीव व्ही. परीख आणि गिरीश शहा यांच्यासह अण्णासाहेब चकोते, जितुभाई शहा, शाहूपुरी जैन संघाचे जसवंतभाई शहा, दिगंबर जैन बोर्डिंग चे सुरेश रोटे तसेच इतर अनेक मान्यवर, कुटुंबीय उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.