बार्शी – समाज प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित द्वितीय ‘संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद’ कार्यक्रमात युवा सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के यांना ‘संत गाडगेबाबा युवा प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष समारोह समिती, महाराष्ट्र’ आणि ‘संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा आकुल धर्मशाळा, सोमवार पेठ, पुणे येथे आयोजित परिषदेत राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, युवक आणि समतावादी विचारांचे पुरस्कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता, युवक प्रबोधन, संविधान जनजागृती, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि जनसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निखिल मस्के यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना उल्हासदादा पवार म्हणाले की, आजच्या काळात समाजाला केवळ भाषणांची नाही तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या युवकांची गरज आहे. निखिल मस्के यांच्यासारखे युवा कार्यकर्ते समाजात समतेचा, विज्ञाननिष्ठेचा आणि मानवतेचा विचार पोहोचवत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर गावोगावी फिरुन समाजजागृती केली. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अशी तरुण मंडळी करत आहेत, हे समाजासाठी आशादायी चित्र आहे.
ते पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबांचे कार्य हे केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे मोठे आंदोलन होते. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमप्रतिष्ठा, शिक्षण आणि समता या मूल्यांचा प्रसार आज अधिक व्यापकपणे होणे आवश्यक आहे. युवकांनी समाजातील विषमता आणि अन्यायाविरुद्ध संवेदनशीलतेने उभे राहून परिवर्तनाची चळवळ मजबूत करावी.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव म्हणून ओळख असलेल्या सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे, कामगार नेते डॉ. रघुनाथ कुचिक, साहित्यिक डॉ. रामदास चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुरहरी केळे होते.
परिषदेचे आयोजन सचिन पाटील, धम्मपाल अडसूळ, प्रा. देविदास बिनवडे, प्रा. वर्षा हांडे, अविनाश अभंगराव आणि क्रांती बोधले यांनी केले. कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.