बार्शी – भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (वाचन प्रेरणा दिन) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये ‘सतत सहा तास अखंड वाचन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील तब्बल १०८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कथा, कादंबरी, कविता अशा विविध प्रकारच्या अवांतर साहित्याचे सलग सहा तास तल्लीन होऊन वाचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर कार्यक्रमाच्या समन्वयक तथा ग्रंथपाल ज्योती यादव यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची रूपरेषा व उद्देश विद्यार्थ्यांसमोर मांडला.
संस्थेचे खजिनदार जे. सी. शितोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, वाचनामुळे विचारांची क्षितिजे रुंदावतात आणि व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जगदाळे यांनी उपक्रमास सदिच्छा भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी दैनंदिन जीवन जगताना वाचनाची असलेली अपरिहार्यता व गरज स्पष्ट केली. विशेष म्हणजे, केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांच्यासह ज्युनियर व सीनियर विभागातील प्राध्यापकांनीही स्वतः प्रत्यक्ष बसून या उपक्रमात वाचन केले. प्राध्यापकांच्या या सहभागामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल ज्योती यादव , ग्रंथालय परिचर, महाविद्यालयातील ज्युनियर व सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.के. एम .माळी यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा.रूपाली शिंदे यांनी केले.
Post Views: 10