सोलापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंढरपूर येथे अत्याधुनिक एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही सेवा जेटसर्व्ह एव्हिएशन, एअर रेस्क्यूअर्स ॲम्बुलन्स आणि विश्वराज एव्हिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारासाठी स्थलांतरित करण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एअर ॲम्बुलन्स हेलिकॉप्टर पंढरपूर येथे दाखल होताच वैमानिक (Pilot), वैद्यकीय पथक आणि ऑपरेशनल टीमचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ. भगवान पवार (उपसंचालक, आरोग्य विभाग), डॉ. अमोल भोर (OSD, आरोग्य मंत्रालय), डॉ. वर्षा डोईफोडे (सिव्हिल सर्जन, सोलापूर), राखी माने (आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका), विवेक कुमार पांडे (जेटसर्व्ह एव्हिएशन), डॉ. संजय मिश्रा (एअर रेस्क्यूअर्स ॲम्बुलन्स) तसेच विश्वराज चाकोते (संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, विश्वराज एव्हिएशन महाराष्ट्र) उपस्थित होते.
आषाढी वारीदरम्यान भाविकांना कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जलद, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही एअर ॲम्बुलन्स सेवा तैनात करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थेला पूरक ठरणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
Post Views: 21