सोलापूर : श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सोलापूरच्या अंतिम वर्ष बी.आर्क. विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत कु. वैष्णवी गुणवंत कारभारी हिने 78.02 टक्के गुण मिळवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. हर्षाली चंद्रशेखर टोणपे हिने 76.03 टक्के गुण मिळवून विद्यापीठात तृतीय क्रमांक (महाविद्यालयात द्वितीय) प्राप्त केला. कु. प्रेरणा राहुल तांबोळी हिने 73.79 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या यशात मानाची भर घातली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





















