सोलापूर : उजनी जलाशयाच्या पाण्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात, अशा अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून करण्यात आलेल्या तपासणीत सोलापूरला पुरवठा होणारे पाणी हे पूर्णपणे सुरक्षित, शुद्ध व पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सोलापूर महानगरपालिकेने शहरवासीयांना दिलासा दिला आहे.
सोलापूर शहराला उजनी जलाशय योजना, भीमा नदी पाणीपुरवठा योजना तसेच एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नागरिकांना दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात अत्याधुनिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात येते. गाळणीकरण, निर्जंतुकीकरण आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या विविध टप्प्यांनंतरच पाणी शहरात वितरित केले जाते.
महापालिकेच्या वतीने कच्चे तसेच शुद्धीकरणानंतरचे पाणी नियमित तपासणीसाठी पाठविले जाते. याच अनुषंगाने पुण्यातील एनएबीएल मान्यताप्राप्त एफएचएचएल (Food Hygiene & Health Laboratory) प्रा. लि. या संस्थेकडून पाण्याच्या नमुन्यांची सखोल तपासणी करण्यात आली. या अहवालानुसार शुद्धीकरणानंतरचे पाणी भारतीय मानक संस्था (BIS) च्या IS 10500:2012 या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ताविषयक निकषांनुसार निर्धारित स्वीकारार्ह मर्यादेत आढळले आहे, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीतही पाणी गुणवत्तेबाबत कोणतीही धोकादायक बाब अथवा आरोग्यास अपायकारक घटक आढळून आले नव्हते.
अलीकडे काही माध्यमे व सामाजिक माध्यमांवर उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होतो, अशा आशयाचे संदेश प्रसारित होत आहेत. मात्र अधिकृत प्रयोगशाळा अहवालांमध्ये किंवा मान्यताप्राप्त संस्थांच्या तपासण्यांमध्ये पाण्यात कोणताही कॅन्सरजन्य धोका आढळून आलेला नसल्याचे व्यंकटेश चौबे यांनी स्पष्ट केले आहे.
दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून
देण्यासाठी महापालिका कटिबद्ध
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये. शहराला सुरक्षित व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी, देखरेख आणि आवश्यक उपाययोजना सातत्याने सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही व्यंकटेश चौबे यांनी केले आहे.
Post Views: 10