सोलापूर : सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत यार्डात आग लागून मुख्य केबल जळाल्याने सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता पाच दिवसांआड होणार आहे.
सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत यार्डात गुरुवारी दुपारी आग लागून मुख्य विद्युत केबल जळाल्याने सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. केबल दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने शुक्रवारपासून उजनी पाइपलाइनसह भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळील उच्चस्तरीय टाकीवर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता पाच दिवसांआड होणार आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यंत्रणेच्या विद्युत यार्डात स्पार्क होऊन आग लागली. या आगीत विद्युत ट्रान्सफॉर्मरकडे येणारी मुख्य इनकमिंग केबल जळाल्याने जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, गुरुवारी दुपारपासून सोरेगाव येथून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा उपसा होऊ शकलेला नाही. मुख्य विद्युत केबल दुरुस्तीचे काम संबंधित वीज यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. यामुळे शहरातील संबंधित भागांना नेहमीच्या वेळापत्रकानुसार पाणी मिळणार नसून, पाणीपुरवठ्याचे एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे.
———–