सोलापूर : यापूर्वी पाणीपुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांनी जे मागितले त्या सर्व सुविधा, निधी देण्यात आले आहे. सोलापूर शहराला सुरळीत, वेळेत पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर शहरासाठी पाण्याचे दिवस कमी करावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पुढील बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी आज पत्रकारांना दिली.
सोलापूर महापालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आज सकाळी शहर पाणीपुरवठा संदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, उपअभियंता सतीश एकबोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
बैठक झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली ते पुढे म्हणाले, प्राथमिक स्तरावरील ही बैठक झाली आहे शहराला सुरळीत वेळेत पाणीपुरवठा कसा करता येईल ? याबाबत चर्चा झाली. पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करणे आवश्यक आहे या संदर्भात सूचना केली आहे. अधिकाऱ्यांनी वेळ मागितली आहे. उन्हाळा तोंडावर आहे. आम्ही निश्चितच पाणीपुरवठा सुधारून दाखवू वेळ द्या. शहरातील वितरण व्यवस्था वाढविण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर दिवस कमी केले तर गोंधळ होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, स्काडा सिस्टीमचा फायदा झालेला आहे. मेन लाईन वरील वॉलसाठी याची मोठी मदत झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा संदर्भात स्काडा सिस्टीम तसेच इतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक अडचणी आणि उपाययोजना सुचविण्यात येतील. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. या सिस्टीमचेही प्रात्यक्षिक थेट पाहण्यात येणार आहे. त्यानंतर काय करायचे आणि काय नाही यावरही चर्चा होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
सात वर्षात 30 हजार नवे नळ कनेक्शन वाढले
शहरात गेल्या सात वर्षात तीस हजार नवे नळ कनेक्शन वाढले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे दिवस वाढले. उन्हाळा तोंडावर असल्याने पाण्याचे दिवस कमी करण्यात अडचणी येणार आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असेही महापौर विनायक कोंडाल यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे – जे मागितले ते – ते देण्यात आले आहे. दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता 1400 कोटीची योजनाही मार्गी लागत आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.
एकवट मानधनावर निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेणार
सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत , वेळेवर आणि पाण्याचे दिवस कमी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागासंदर्भातील निवृत्त अधिकाऱ्यांनाही एकवट मानधनावर सेवत घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्या अनुषंगाने काही निवृत्त अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकीला बोलवावे : अमोल शिंदे
शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले,
पाणीपुरवठा संदर्भात झालेल्या बैठकीला महापौर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना निमंत्रित केले नाही. अशा बैठकींना सर्वांना निमंत्रित करणे गरजेचे आहे. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन ही बैठक झाली.पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. लोकांमध्ये या संदर्भात तीव्र भावना आहेत. सोलापूरकरांना या नियोजनाचे कळाले पाहिजे. दुहेरी जलवाहिनीचे काम झाले तरीही शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही. अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
महापौरांनी यापुढे सर्वपक्षीय गटनेत्यांना बैठकांना बोलावले नाही तर अखेर आयुक्तांसोबत आम्हालाही स्वतंत्र बैठका घ्याव्या लागतील असे सांगतानाच इथे श्रेयवाद महत्त्वाचा नाही. चांगले काम झाले अथवा नसेल तर भाजपाची सत्ता असल्याने त्यांना श्रेय अथवा अपयश स्वीकारावे लागणार आहे, असेही अमोल शिंदे म्हणाले.






















