सोलापूर : ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सक्षम आर्थिक व्यवस्थापनाच्या बळावर नीलकंठ को-ऑप बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मार्च २०२६ अखेर बँकेला १ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करत बँकेने ‘अ’ वर्ग ऑडिट प्राप्त केले असून एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळविल्याची माहिती बँकेचे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी दिली.
नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँक लि सोलापूर या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी माहेश्वरी सांस्कृतिक भवनात अतिशय उत्साहपुर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन पद्मा भुतडा, संचालक रमेश राठी, चंद्रकांत तापडिया, प्रदिपकुमार शिंगवी, जमनादास भुतडा, कौस्तुभ करवा, शरद कालाणी, सचिन कोठारी, अभिजीत चिल्लाळ, किरण शेरखाने, नंदकुमार भोसले, सीएस नंदा भट्टड, तज्ञ संचालक सीए आनंद झंवर, ॲड.महेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला बँकेचे संस्थापक दिवंगत विश्वनाथ करवा यांना अभिवादन करण्यात आले तसेच दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रांरभी स्वागत बँकेच्या व्हॉइस चेअरमन पद्मा भुतडा यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बलदवा यांनी मांडलेल्या मागील इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तज्ञ संचालक सीए आनंद झंवर यांनी लेखा परीक्षित ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचून दाखविले. सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी अहवाल वाचन व अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. चेअरमन सीए नोगजा यांनी बँकेने मागील काळात केलेल्या प्रगतीचा आलेख हा सभागृहासमोर मांडला.
चेअरमन सीए धनराज नोगजा
पुढे म्हणाले, अवघ्या २८ वर्षांपूर्वी सर्वांच्या सहकार्याने स्थापन झालेली नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँक आज तीन शाखांद्वारे यशस्वीपणे ग्राहकांना सेवा देत आहे. सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वास व सहकार्याच्या बळावर बँकेने ही यशस्वी वाटचाल घडवून आणली आहे. सक्षम आर्थिक शिस्तीमुळे बँकेने थकबाकीवर प्रभावी नियंत्रण ठेवले असून, एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. ही बँकेसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी आहे. केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीची परंपराही बँकेने सातत्याने जपली असून, सर्वच क्षेत्रांत समाधानकारक प्रगती साधली आहे, असे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी सांगितले.
बँकेचे चेअरमन सीए नोगजा यांच्या परवानगीने संचालकांनी विविध विषय मांडले व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्या विषयांना मान्यता दिली. यंदा सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णयही घेण्यात आला. याप्रसंगी संचालक, अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी दिली. यावेळी विजयकुमार शाबादी यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जनरल मॅनेजर सीए शुभम सोमाणी, ब्रँच मॅनेजर गोविंद पंचारिया, प्रकाश सांगा, विश्वनाथ बळगानुरे, सुत्रसंचालन अन्नपूर्णा सामलेटी यांनी केले. आभार संचालक चंद्रकांत तापडिया यांनी मानले. यावेळी बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वासाचा ठेवा जपत नीलकंठ
बँकेची दमदार झेप
निव्वळ नफा – १.८६ कोटी रुपये
ठेवी – २११. ५९ कोटी
भाग भांडवल – ५.३६ कोटी
खेळते भांडवल – २४७.१३ कोटी
कर्जे – १२६. ८४ कोटी,
निधी – १५.४९ कोटी ,
गुंतवणूक – ८७.१३ कोटी
एनपीए – ०.०० टक्के
ऑडिट वर्ग – अ
Post Views: 13