सोलापूर – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी अंतिम टप्प्यात असून समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वितरणाला वेग आला आहे. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाने वितरणाची व्यापक मोहीम राबविली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने उर्वरित पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण लवकर पूर्ण करून प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३,८४५ शाळांमधील ४ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ९९ हजार ५२२ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी १९ लाख ३२ हजार ४०८ (८७.८६ टक्के) पाठ्यपुस्तके तालुका स्तरावर प्राप्त होऊन शाळांमध्ये वितरित करण्यात आली आहेत.
उर्वरित २ लाख ६७ हजार ११४ (१२.१४ टक्के) पाठ्यपुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. विशेषतः कन्नड व उर्दू माध्यमातील काही पुस्तके तसेच बदललेल्या अभ्यासक्रमातील काही विषयांची पुस्तके छपाईनंतर उपलब्ध होताच तातडीने शाळांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मोफत गणवेश योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २,८४१ शाळांमधील १ लाख ८० हजार ५२७ विद्यार्थ्यांसाठी ४ कोटी ३३ लाख २६ हजार ४८० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. शासनाकडून पहिल्या टप्प्यात प्रति विद्यार्थी २४० रुपये (८० टक्के) अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून त्यानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत गणवेश शिवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत १ लाख २४ हजार ५६४ विद्यार्थ्यांना (६९ टक्के) गणवेश मिळाले असून ५५ हजार ९६३ विद्यार्थ्यांना (३१ टक्के) पुढील चार ते पाच दिवसांत गणवेश उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
चौकट
समग्र शिक्षाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन गणवेशांसाठी ६०० रुपये, तर बूट व मोज्यांसाठी १२० रुपये इतके अनुदान दिले जाते. तसेच जिल्ह्यातील ३९ पीएम श्री शाळांनाही प्रति विद्यार्थी दोन गणवेशांसाठी स्वतंत्र निधी वितरित करण्यात आला आहे.