सोलापूर : शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम शहरभर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी दिली.
सर्वेक्षणात आढळणाऱ्या प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शहरातील वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, झोपडपट्ट्या, बाजारपेठा, स्थलांतरित मजुरांची वस्ती, रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांचा शोध घेतला जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे.सर्वेक्षणासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कुटुंबनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शाळाबाह्य बालकांची नोंद केली जाईल. सर्वेक्षणात आढळलेल्या प्रत्येक बालकाला परिसरातील जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
विहित मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी सर्व संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना ही मोहीम प्रभावीपणे राबवून विहित मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 19