कंदलगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील एका मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यात परवान्याविना औषधांची खरेदी करून त्याची साठवणूक करत विक्री केल्याचे तपासणीत उघड झाली असून यावेळी दोन प्रकारच्या औषधांचे नमुनेही तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहे. एफडीए विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जय लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या औषध विक्री केंद्रातून ₹१ लाख १३ हजार ८०० किमतीचा ॲलोपॅथिक औषधसाठा जप्त करण्यात आला. तपासणी दरम्यान संबंधित औषध विक्री केंद्राचा औषध विक्रीच्या परवान्याची मुदत १९ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आल्यानंतर संबंधितांकडून त्याचे नूतनीकरण केली नसल्याची बाब उघड झाले. संबंधित व्यावसायिकाकडून परवान्याविना ॲलोपॅथिक औषधांची खरेदी करून त्याची साठवणूक केली व त्या औषधांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन मानून एफडीएने संपूर्ण औषधसाठा जप्त केला. या कारवाई दरम्यान पुढील तपासासाठी दोन औषधांचे नमुने घेण्यात आले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून एफआयआर दाखल करण्याबाबतची कार्यवाहीही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (औषधे) अरुण गोडसे यांनी केली. या कारवाईला पुणेचे संयुक्त आयुक्त (औषधे) गिरीश हुकारे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 16