सोलापूर – शिक्षक दिनीच जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ‘मूक एल्गार’ सोलापुरात पाहायला मिळणार आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या, मात्र सुरुवातीला विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तत्त्वावर कार्यरत राहून नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी, दि. ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघा’च्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार असून, शिक्षक नेते तथा माजी आमदार दत्तात्रय सावंत मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटना, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आंदोलनाचे स्वरूप शांततापूर्ण असणार असून शासनाच्या धोरणाविरोधातील निषेधाचे प्रतीक म्हणून मोर्चातील सहभागी काळे मास्क परिधान करणार आहेत. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या आंदोलनामुळे जुन्या पेन्शनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले. जुन्या पेन्शन योजनेचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना पूर्ववत व नियमितपणे मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, गुरुनाथ वांगीकर, सरदार नदाफ, समाधान घाडगे यांच्यासह महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
कुटुंबीयांसह सहभागी होण्याचे आवाहन
मोर्चात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.