पंढरपूर – सणातील सर्वांत मोठा सण म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचा सण अवघ्या सहा ते सात दिवसांवर आलेला आहे. या वर्षी तब्बल १२ दिवस गणेशोत्सवाची धुम असणार आहे. कारण सोमवारी १४ सप्टेंबरला गणरायांचे आगमन होवून शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी अनंतचतुदर्शी आलेली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहर तसेच उपनगरातून खास गणरायांच्या मुर्ती विक्रीचे खास स्टाँल लावण्यात आल्याचे दिसत आहे. या बरोबरच शहराच्या बाजारपेठेतील दुकाने गणेशाच्या मुर्ती तसेच उत्सवातील सजावटीच्या साहित्यांनी सजलेल्या दिसत आहेत. यंदा लालबागचा राजा, चिंतामणी, दगडूशेठ आदी प्रकारच्या गणेश मूर्तीना चांगली मागणी आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळां बरोबरच घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करून आकर्षक सजावट करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदाही बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी निर्माण झालेली आहे. विविध रंगांतील फुलांच्या माळा, कमळ, गुलाब, झेंडू यांसह विविध फुलांच्या आकर्षक प्रतिकृती बाजारात खास विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर हिरवीगार दिसणारी प्लास्टिकची पाने, वेली, तोरणे आणि सजावटीच्या माळांनी दुकाने सजली आहेत.
———————–
चौकट : ( खरेदीसाठी गर्दी वाढणार )
गणरायाच्या आगमनापूर्वीच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी दिवसांत गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेला आतापासूनच उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. फुलांच्या माळा, कमळ, गुलाब, झेंडू यांसह विविध फुलांच्या आकर्षक प्रतिकृती बाजारात उपलब्ध आहेत.
या बरोबरच बाजारपेठेतील स्थानिक मुर्तीकारांनी तयार केलेल्या मुर्ती बरोबरच येथील गणपतीमुर्तींची विक्री करणाऱ्या दुकानांमधून पेण, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर आदी भागातून विक्रीसाठी गणरायांच्या मुर्ती येथील विक्रेत्यांनी आणलेल्या आहेत. अगदी छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत विविध आकर्षक रूपांतील गणरायाच्या मूर्ती बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. पारंपरिक रूपातील मूर्तीसह विविध कलाकुसर केलेल्या आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या मूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
—————–
चौकट : ( प्लास्टिकच्या फुलांना मागणी )
गणेशमूर्तीसोबतच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची गर्दी वाढत आहे. कमी खर्चात आकर्षक सजावट करता यावी, यासाठी अनेकजण प्लास्टिकच्या फुलांना व माळांना पसंती देत आहेत. विविध प्रकारच्या साहित्यामुळे बाजारपेठेतील दुकाने रंगीबेरंगी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
—————–
कोट
गेल्या आठ ते दहावर्षांपासून आपण गणपतीमूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत आहे. लालबागचा राजा, चिंतामणी आणि दगडूशेठ मूर्तीना सर्वात जास्त मागणी दिसत आहे. अगदी सणाच्या तोंडावर ऐनवेळी चांगल्या मुर्ती विकल्या जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांनी अगोदरच आपल्याकडे येवून पैसे भरुन मुर्तीचे बुकींग केलेले आहे.
अंबादास डांगे ( मूर्ती विक्रेता )
Post Views: 12