बार्शी – येथील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय व अलौकिक कार्याने वेगळा ठसा उमटवणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यासाठी लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील रामकृष्ण हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात चाटे शिक्षण समूह बार्शीचे संचालक श्री. पांडुरंग घाडगे यांना यंदाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्स क्लबच्या झोन चेअरमन ला. ॲड. अमिता कारंडे उपस्थित होत्या. त्यांनी क्लबला अधिकृत भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी लायन्स क्लबच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या सेवाकार्याचा गौरव केला, तसेच शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याबद्दल पुरस्कारप्राप्त पांडुरंग घाडगे यांचे विशेष कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेेश बागुल, सेक्रेटरी ला. दयानंद रेवडकर आणि खजिनदार ला. उमेश जाधव यांच्यासह क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व हितचिंतकांनी परिश्रम घेतले. पांडुरंग घाडगे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बार्शीतील शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.