सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे बसस्थानक उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंद्रूप ग्रामपंचायतीने बसस्थानकासाठी जागा नाममात्र दराने भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तसेच, यासंदर्भात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी याबाबत पाठपुरावा केला होता त्याला यश आले आहॆ. बसस्थानक उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
मंद्रूप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, परिसरातील अनेक गावांतील नागरिक प्रवासासाठी मंद्रूपवर अवलंबून असतात. सध्या बसस्थानकाच्या सुविधेअभावी प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतंत्र बसस्थानक उभारल्यास विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बसस्थानक उभारणीसंदर्भातील काम सध्या विभागीय स्तरावर प्रगतीपथावर असून, पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंद्रूप येथे लवकरच बसस्थानक उभारले जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बसस्थानकाच्या मागणीला प्रशासकीय स्तरावर सकारात्मक दिशा मिळाली असून, आता प्रत्यक्ष बसस्थानक उभारणीच्या पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 8