सोलापूर – येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. वसंतराव एकबोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या संग्रहातील दूर्मीळ व बहुमूल्य पुस्तके सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयास प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजता हि.ने. वाचनालयाच्या अँफी थिएटरमध्ये होणार असल्याची माहिती एकबोटे परिवारातर्फे शरदकुमार एकबोटे व सुहास एकबोटे आणि वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी तर प्रमुख पाहुणे म्हणून दै. ‘संचार’चे संपादक धर्मराज काडादी, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांची उपस्थिती असेल. पत्रकारिता : काल, आज आणि उद्या या विषयावर अध्यक्ष विवेक घळसासी श्रोत्यांशी संवाद साधतील
वसंतराव एकबोटे यांनी ‘संचार’मध्ये सहसंपादक म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. त्याआधी ‘सोलापूर समाचार’, ‘विश्वसमाचार’मध्येही ते सहसंपादक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सोलापूर प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. आचार्य प्र. के. अत्र्यांच्या ‘मराठा’चे ते सोलापूर जिल्हा प्रतिनिधी होते. याखेरीज ‘किर्लोस्कर’, ‘वसुधा’, ‘अमृत’, ‘स्वराज्य’, ‘मंथन’ अशा अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी विपूल लेखन केले होते. मिश्किल शैलीतील त्यांचे ललित लेखन वाचकप्रिय झाले होते. त्यांचे ‘अवतीभवती’, ‘शरसंधान’, ‘हायब्रीड हुरडा’, ‘खट्याळकी’ हे स्तंभ गाजले. ‘सदबा पाटील’ हा त्यांचा मानसपुत्र (व्यक्तिरेखा) संस्मरणीय ठरला. श्री. एकबोटे यांनी ‘मीना’, ‘अवतीभवती’, ‘नवरा सिंडिकेट-बायको इंडिकेट’ ही पुस्तके लिहिली आहेत. हिराचंद नेमचंद वाचनालयासह ‘लक्ष्मी बँक’, ‘नाट्यआराधना’, श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते. दमाणी साहित्य पुरस्कार समितीचेही ते सदस्य होते. उत्तम नाट्यकलावंत म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
त्यांच्या संग्रहातील शेकडो दूर्मीळ पुस्तके सुजाण वाचकांना उपलब्ध व्हावीत, या हेतूने एकबोटे परिवाराने ती हि.ने.वाचनालयास प्रदान करण्याचे योजले आहे. या कार्यक्रमास सर्व रसिक, वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्याताई एकबोटे यांनी केले आहे.
Post Views: 9