सोलापूर : JITO सोलापूर चॅप्टरच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्यांत विविध उपक्रमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, JITO Business Network (JBN) सोलापूर चॅप्टरचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे सोलापूरमधील उद्योजकांना परस्पर व्यावसायिक संबंध दृढ करण्याची, व्यवसायवृद्धीची आणि नव्या संधी निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमात JITO सोलापूर चॅप्टरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी व्यवसायवृद्धीसाठी नेटवर्किंगचे महत्त्व अधोरेखित केले.
चॅप्टरचे सचिव अमितकुमार जैन यांनी मागील दोन महिन्यांतील उपक्रमांचा आढावा घेतला. उद्योजकांच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि व्यवसायवृद्धीस चालना मिळावी, यासाठी उद्योजकांच्या पॉडकास्टची मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला पॉडकास्ट JITO ROM झोनचे अध्यक्ष रविंद्रजी खिनवसरा यांच्यासोबत नियोजित असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी मालदीवसोबत आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकीच्या संधींवर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. JITOच्या युवा आणि महिला विभागामार्फतही विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रविंद्रजी खिनवसरा यांनी सोलापूर चॅप्टरच्या अल्पावधीत केलेल्या कामाचे कौतुक केले. केवळ दोन महिन्यांत चॅप्टरने राबवलेल्या सक्रिय उपक्रमांमुळे आपणही सोलापूर चॅप्टरचे सदस्य होण्यास उत्सुक झालो, असे त्यांनी नमूद केले. आगामी दोन वर्षांत वसतिगृह उभारणे, उद्योजकांना स्वावलंबी बनवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि समाजाच्या सहकार्याने व्यवसायवृद्धीस चालना देणे, ही महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले. JBNच्या माध्यमातून उद्योजकांना एकमेकांच्या अनुभवाचा आणि व्यावसायिक संपर्कांचा लाभ घेता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला आशीष पंचमिया, सचिन भस्मे, चित्रांग डाखलिया, प्रतीक शाह, महावीर जैन, महावीर कावड, सिद्धार्थ गांधी, सपना रामभीया, पंकज जैन, तनमय कोठारी आणि इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी JITO सोलापूर चॅप्टरचे सह-कोषाध्यक्ष (Joint Treasurer) साहिल भंडारी यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, JITO पदाधिकारी, JBN सदस्य आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

















