बार्शी – बार्शी नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी दिवाळीसाठी २० हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, ग्रामपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. २८ रोजी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष नितीन शेंडगे, आनंद कांबळे नेमिनाथ पवार, अजित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहअध्यक्ष अतिश रोकडे, जयपाल वाघमारे, सचिन वाघमारे, शेखर कसबे, अर्जुन कांबळे, धीरज गजधने, फुलचंद खलसे, उदय पवार यांनी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले.
शासनाने नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बोनस देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही मागणी केल्याचे अतिश रोकडे म्हणाले. याबाबत मुख्याधिकारी तैमूर मुलाणी म्हणाले, आरोग्य विभागात २१० सफाई कर्मचारी आहेत त्यानुसार आस्थापना विभागाशी चर्चा करून नियमानुसार आणि कायदेशीर बाबी बघून निर्णय घेऊ, असे सांगितले.