सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित आराखड्यात १३२ कोटी रुपयांची कपात करून तो १,३३१ कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे. या आराखड्याचे राज्याचे वित्त विभागाचे सचिव यांच्यासमोर पुन्हा एकदा आकडेवारीची तपासणी करण्यात आल्यानंतर आता या योजनेचे अंतिम सादरीकरण सोमवारी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासमोर होणार आहे .
या प्रस्तावाबाबत आणखी चर्चा होणार असून, शुक्रवारी (३० ऑक्टोबर) पुन्हा सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर सोमवारी (२ नोव्हेंबर) अंतिम सादरीकरण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली . त्यामुळे या योजनेच्या खर्चाबाबत काय निर्णय होतो, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.सोलापूर शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचा खर्च कमी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यापूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बंगळूर आणि शिमला येथील पाणीपुरवठा योजनांचा अभ्यास करून सुधारित आराखडा तयार केला. या आराखड्याचे बुधवारी मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. मात्र, प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याने त्यातील आर्थिक तरतुदींची तपासणी सुरू आहे.
सुधारित आराखड्यात योजनेच्या खर्चातून १३२ कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये कर्जाच्या हप्त्यांसाठी राखीव असलेल्या ५० कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश वगळण्यात आला आहे. तसेच सौरऊर्जा प्रकल्पासाठीची ५ कोटी रुपये, रस्त्यांसाठीची २५ कोटी रुपये आणि अन्य प्रस्तावित कामांसाठीची २२ कोटी रुपयांची तरतूद कमी करण्यात आली आहे.
या कपातीनंतरही योजनेच्या एकूण खर्चाबाबत शासनाकडून छाननी केली जात आहे. वित्त विभागाकडून सुधारित आराखड्याची तपासणी झाल्यानंतर मुख्य सचिवांसमोर पुन्हा सादरीकरण होणार आहे.
शुक्रवारी होणाऱ्या सादरीकरणानंतर सोमवारी या प्रकरणाची अंतिम सादरीकरण होणार असल्याने योजनेच्या मंजुरीच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. सुधारित आराखड्यातील खर्चकपात शासनाला मान्य होते का, आणखी काही बदल सुचविले जातात का आणि योजनेला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा होतो का, हे सुनावणीनंतर स्पष्ट होईल.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने प्रस्तावित असलेल्या या योजनेमुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे. त्यामुळे सुधारित आराखड्याला मंजुरी मिळण्याबाबत महापालिका प्रशासनासह शहरवासीयांचेही लक्ष लागले आहे.
Post Views: 14