सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी देय असलेल्या सुमारे सहा कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात अंदाजे दोन कोटी रुपये अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला दिले आहेत. ही रक्कम तीन टप्प्यांत देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
महापालिका पेन्शनर संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे निवेदन दिले होते. कोठे यांनी या मागण्यांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी संबंधित अधिकारी आणि पेन्शनर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची मागणी संघटनेने केली होती. त्यानुसार एकूण सहा कोटी रुपयांपैकी ३५ टक्के म्हणजेच अंदाजे दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. उर्वरित रक्कम पुढील दोन टप्प्यांत देण्याचे नियोजन आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय विमा योजना लागू करण्याबाबत पुढील दोन दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच १०, २० आणि ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची वेतनवाढ देऊन त्यानुसार पेन्शन निश्चित करण्यासाठी ठरावाचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
या बैठकीस माऊली पवार, नानासाहेब शिर्के, तडकल इक्बाल, मेलगे, योगिनाथ वानरोटे, कांगरे, काझी, चरके, पिसे, कोंडगुळे, शहापुरे बशीर यांच्यासह अन्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 15