सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीतील साहित्य खरेदी आणि सेवांवरील खर्चाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासमोर चौकशी समितीची सुनावणी झाली. तीन कोटी रुपयांचे टेंडर असताना सात कोटींची बिले कशी सादर झाली, दहा कोटींची मर्यादा असताना आधीची बिले कशी अदा केली, असे सवाल तक्रारदार नगरसेवकांनी उपस्थित केले.जुन्या समितीतील अधिकाऱ्यांना पुन्हा पाचारण करावे.शासनाच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
निवडणुकीतील साहित्य आणि खर्चासंदर्भात भाजपच्या नगरसेवकांसह उपमहापौरांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका अर्चना वडनाल, कामगार कल्याण व सामाजिक न्याय समितीच्या सभापती श्रद्धा पवार, मंजिरी किल्लेदार, विधी समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
टेंडर न मिळालेल्या मक्तेदारांनी सेवा कशी पुरवली, त्यांची बिले घाईने का अदा करण्यात आली आणि काही बिले रोखीने का दिली, असे प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केले. मंडप व खुर्च्यांच्या बिलांमध्ये रक्कम कशी वाढली, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले. दमदाटी करून कामे करून घेतल्यामुळे बिले वाढल्याचा दावा मक्तेदारांनी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
भाडेतत्त्वावर घ्यायचे फर्निचर खरेदी का केले आणि खरेदी केलेले फर्निचर सध्या कुठे आहे, असा सवालही करण्यात आला. यापूर्वीच्या समितीतील अधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणीसाठी बोलवावे, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे नगरसेविका अर्चना वडनाल यांनी सांगितले.
या प्रकरणाची शासनाच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करणार असल्याचेही वडनाल यांनी स्पष्ट केले.
——–
Post Views: 16