धाराशिव : यंदा पावसातील दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना पीक विम्यापोटी हेक्टरी ४० हजार रुपये, तर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसह राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान म्हणून हेक्टरी १८ हजार ५०० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील सुमारे चार लाख ७७ हजार शेतकरी बांधवांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत दिवाळी पूर्वी मिळावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीत शेतकरी बांधवांना पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या मदतीतून जास्तीत जास्त आर्थिक आधार मिळणे आवश्यक आहे. आज घडीला जिल्ह्यात ५०२ पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून पिकाची प्रत्यक्ष उत्पादकता निश्चित केली आहे. सर्व महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे विदारक असे चित्र समोर आले आहे. पीक कापणी प्रयोगांचे अंतिम निष्कर्ष हे संबंधित महसूल मंडळांची उत्पादकता निश्चित करतील. त्यानुसार पीक विम्याची अंतिम भरपाई ठरणार आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता पात्र शेतकरी बांधवांना हेक्टरी अंदाजे ४० हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम लवकर मिळावी, यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
पीक विम्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी पात्र शेतकरी बांधवांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी ८ हजार ५०० रुपये अनुदान देय आहे. याशिवाय, गतवर्षीप्रमाणे राज्य शासनाकडून हेक्टरी किमान १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळणे अपेक्षित आहे. या पेक्षा जास्त मदत मिळावी यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत. या दोन्ही मदतींचा विचार करता हेक्टरी किमान १८ हजार ५०० रुपये अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. पीक विम्याची अंदाजित ४० हजार रुपयांची भरपाई आणि अनुदानाची अपेक्षित रक्कम मिळून हेक्टरी ५८ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. मात्र, प्रत्यक्ष मदतीची रक्कम शासनाचे निर्णय, लागू निकष आणि पात्रतेनुसार निश्चित होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याला एकूण मदत ₹२३८.५० कोटी
४.७७ लाख शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रीम मदत;
पीक विम्याची अंतिम भरपाई मिळण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तातडीचा आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचे जाहीर केले आहे व त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमारे चार लाख ७७ हजार शेतकरी खातेदारांना या मदतीचा लाभ मिळाल्यास एकूण २३८ कोटी ५० लाख रुपयांचे वितरण होणार आहे.
प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच
पीक विमा भरपाई, नैसर्गिक आपत्तीचे अनुदान आणि अग्रीम मदत या तिन्ही माध्यमांतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम लवकर जमा झाली पाहिजे. मदतीच्या प्रक्रियेत अनावश्यक विलंब न होता शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.