माळशिरस : अकलूज पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलेल्या अवैध अग्निशस्त्र प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नमूद असलेले विकास कैलास वजाळे (वय ३१, रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर) यांना माळशिरस येथील मा. JMFC न्यायालयाने आज ₹२५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या प्रकरणात पोलिसांनी विकास वजाळे यांच्याकडून अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केल्याचे पोलीस कागदपत्रांमध्ये नमूद आहे. सदर प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३, ५ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान तब्बल १७ रिव्हॉल्व्हर आणि ४७ जिवंत काडतुसे विक्री केल्याबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच तपासाच्या पुढील टप्प्यात आरोपी विकास वजाळे याने आणखी अग्निशस्त्रे देण्याबाबत माहिती दिल्याचे पोलीस प्रेस नोटमध्ये नमूद असून, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून काही अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आज माळशिरस येथील मा. JMFC न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने आरोपी विकास कैलास वजाळे यांचा जामीन अर्ज मंजूर करत ₹२५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपी विकास वजाळे यांच्या वतीने ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.
Post Views: 17