सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील करंजगी परिसरात ग्रामीण आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी हालचालींना वेग आला असून प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणेने प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी जिल्हा परिषद सदस्य ॲड. विकास बुळा यांच्यासमवेत प्राथमिक आरोग्य केंद्र, करंजगी येथे भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत व बाह्य परिसराची पाहणी करण्यात आली. करंजगी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने प्रस्तावित जागेची पाहणी करून भविष्यातील आरोग्य सुविधा अधिक परिणामकारकपणे उभारण्यासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य ॲड. विकास बुळा यांनी रुग्णालयाच्या नियोजनासंदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना करत स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यावर भर दिला.
भेटीदरम्यान डॉ. कोपूरवाड यांनी आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक जलद, दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, सरपंच विवेकानंद उंबरजे, उपसरपंच शब्बीर पटेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर पटेल, डॉ. मुस्तकीम काझी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
करंजगीसह परिसरातील ग्रामीण नागरिकांना आधुनिक व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासन कटिबद्ध असून ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीमुळे या भागातील आरोग्य सेवांना नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी व्यक्त केला.
Post Views: 11