बार्शी – शासन निर्णयानुसार रविवार दि. ५ जुलै रोजी सकाळी बार्शी दुय्यम कारागृहातील सर्व ५१ बंदीजनांना सुरक्षितपणे कळंबा कारागृह, कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर बार्शी दुय्यम कारागृह अधिकृतरीत्या कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे.
राज्यातील एकूण ११६ दुय्यम कारागृहांपैकी केवळ ३६ कार्यरत होती, तर ८० कारागृहे यापूर्वीच बंद अवस्थेत होती. आधुनिक कारागृह व्यवस्था, वाढलेले सुरक्षा निकष आणि जिल्हा व उपकारागृहांची उपलब्धता लक्षात घेऊन शासनाने ही जुनी व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बार्शीतील दुय्यम कारागृह न्यायालयीन कामकाजासाठी आरोपींना अल्पकाळ ठेवणे तसेच तात्पुरत्या कोठडीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत होते. मात्र, बदलत्या प्रशासकीय गरजा आणि आधुनिक कारागृह व्यवस्थेमुळे या कारागृहांची आवश्यकता कमी झाल्याचे शासनाने नमूद केले आहे.
तहसीलदार तथा अधीक्षक, दुय्यम कारागृह एफ.आर. शेख बार्शी यांच्या आदेशानुसार कारागृहातील सर्व ५१ आरोपींना आवश्यक सुरक्षा व्यवस्था करुन, पोलीस बंदोबस्तात कळंबा कारागृहात रवाना करण्यात आले.
बार्शी दुय्यम कारागृहाचा प्रवास संपला असला, तरी अनेक अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी येथे बजावलेली कर्तव्यनिष्ठ सेवा कायम स्मरणात राहणार आहे. अनेक दशकांपासून या कारागृहाने न्यायव्यवस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. आज या कारागृहाचे दरवाजे कायमचे बंद झाले असले, तरी येथील शिस्त, सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि मानवी मूल्यांचा वारसा कायम जिवंत राहील.