बार्शी – बार्शी तालुक्यातील मौजे पिंपळवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या भीषण अपघातांमुळे ग्रामस्थांचा संताप उसळला. आज सकाळी झालेल्या आणखी एका अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आज सकाळी अविदाबाई शिवराज चौधरी (वय ६५, रा. पिंपळवाडी) रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि ‘जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही,’ असा इशारा प्रशासनाला दिला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ महिन्यांत या ठिकाणी अनेक गंभीर अपघात झाले आहेत. आठ महिन्यांपूर्वी एक व्यक्ती दुचाकी व चारचाकी वाहनाच्या धडकेत ५०० मीटरपर्यंत फरफटत गेली होती. पाच महिन्यांपूर्वी सुवर्णा गौतम चौधरी (वय ६५) यांचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वी रामदास योगीराज चौधरी (वय ५२) यांना दुचाकीची धडक बसून ते गंभीर जखमी झाले असून, सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आणखी किती बळी पडल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी तातडीने गतीरोधक, सूचना फलक, स्पीड कंट्रोल उपाययोजना आणि सुरक्षितता व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने यापूर्वीच गतीरोधक बसविण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग असल्याने जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची परवानगी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रस्ताव सोलापूर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.
दरम्यान आणखी जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Post Views: 16