बार्शी – शहरातील सिद्धेश्वरनगर परिसरातील एका घरातून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवणसिद्ध दुर्गप्पा कट्टीमणी (वय ७३, रा. सिद्धेश्वरनगर, बार्शी) यांचे आशा टॉकीज परिसरात पादत्राणांचे दुकान असून ते त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत दुकानात असतात. त्यांच्या घरी पत्नी व नातू राहतात.
दि. २७ जून रोजी सकाळी एका कौटुंबिक कार्यासाठी बाहेर जाण्याची तयारी सुरु असताना त्यांच्या पत्नीने बेडरुममधील कपाटातून सोन्याचे दागिने काढण्यासाठी कपाट उघडले. मात्र कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर घरामध्ये सर्वत्र शोध घेऊनही दागिने सापडले नाहीत. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय घरातील बेडरुममधील कपाटातून हे दागिने चोरुन नेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
Post Views: 7